स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल

[ad_1]
पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरोधात ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. मकानदार यांच्या न्यायालयात दाखल केले. गुन्हा घडल्यानंतर ५२ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये ८२ साक्षीदार तपासून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदविण्यात आले आहेत.
बारा पंचनामे करण्यात आले असून, त्यामध्ये गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनितीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही चित्रीकरण आणि निवेदन या पाच महत्त्वाच्या पंचनाम्यांतून आरोपीविरोधात भक्कम पुरावे सादर करण्यात आले आहेत.
स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहितेनुसार कलम ६४ (बलात्कारासाठी शिक्षा), ६४ (२) (एम) (वारंवार बलात्कार), ३५१ (२) (धमकावणे), ११५ (२) (जाणीवपूर्वक दुखापत पोहोचविणे) आणि १२७ (२) (डांबून ठेवणे) यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हा केल्यावर पोबारा करत गुनाट गावी शेतात लपून बसलेल्या आरोपीला पुणे पोलिसांनी तीन ड्रोन कॅमेरे, श्वानपथक आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जेरबंद केले.
न्यायालयाने आरोपीला १२ दिवस पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी दत्तात्रय गाडे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. तपास अधिकारी शैलेश संखे यांच्या पथकाने आरोपीविरोधात भौतिक, जैविक, वैद्यकीय, तांत्रिक, परिस्थितिजन्य, शास्त्रीय पुरावे गोळा केले आहेत. सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांच्यामार्फत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
[ad_2]
Source link